मार्डी शिवारातील शेतकरी व्यथित..
पालकमंत्री हरविल्याची मारेगाव पोलिसात तक्रार.
शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे असताना, समस्या निकालात काढणारे वाली हरपल्याचा आरोप.
आनंद नक्षणे— मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीपासून त्रस्त, तर वन्यप्राणी उभे पिके नष्ठ करीत आहे. महावितरणच्या लोडशेडींग प्रश्नांचे निरसन करण्यात लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.मात्र यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आजतागायत वणी विधानसभा क्षेत्रात फिरकले नसल्याने येथील शेतकऱ्यांनी थेट पोलिसात पालकमंत्री हरविल्याची तक्रार दाखल केली.
मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या पांदण रस्ते नाही , विजेच्या लपंडावाने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर , रस्त्याची दुरावस्था , वन्यप्राण्यांचा हैदोसाने पिकांचे प्रचंड नुकसान आदी समस्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना व्यवस्थेने सपशेल नाकारले आहे.आता पालक म्हणून मानगुटीवर बसलेल्या समस्या पालकमंत्र्यांनीच हाताळाव्या मात्र मारेगावचा चेहराच न पाहिलेले पालकमंत्री हरविल्याचा भास होत असतांना त्यांना शोधण्याची किंबहूना पालकमंत्री हरविल्याची तक्रार बहुसंख्य शेतकऱ्यांनी पोलिसात दाखल केली आहे.त्यांचा तात्काळ शोध घेवून आमच्या समस्या निकाली काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी अशोक धोबे , सुधाकर धोबे , प्रमोद खिरटकर , माणिक पांगुळ , संजय पारखी , नानाजी डाखरे , विजय धानोरकर , दौलत बदखल , सुरेंद्र काकडे , प्रमोद खंडाळकर , भास्कर दानखडे , संजय येरमे , नंदेश्वर आसुटकर यांचेसह बहुसंख्य मार्डी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.