पांढरकवड्यात मानवतेचा खून !
नवजात बालिकेला नाल्यात फेकणाऱ्यांना तात्काळ अटक करा – अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार.
बेटी बचाव फक्त घोषणा, नवजात बालिकेला मारण्याच्या प्रयत्न..
नौशाद तवर – पांढरकवडा
पांढरकवडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ (हनुमान वार्ड) येथे नवजात मुलीला नाल्यात फेकून देण्याची घटना ही केवळ धक्कादायक नसून, संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी आणि समाजाच्या संवेदनशीलतेवर थेट प्रहार करणारी आहे. बुधवार दि. 28 जानेवारी रोजी पहाटे उघडकीस आलेली ही घटना म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, बालहक्कांची थट्टा आणि संविधानिक मूल्यांची निर्लज्ज पायमल्ली आहे.
नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाजवळून वाहणाऱ्या नाल्यात अवघ्या १–२ तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बालिकेला नाळेसह फेकून देण्यात आले. नाळेवर वीट ठेवून आणि आजूबाजूला दगड टाकून त्या चिमुकलीचा जीव घेण्याचा अमानवी प्रयत्न करण्यात आला. हे कृत्य करणाऱ्यांचे मनुष्य म्हणून अस्तित्वच प्रश्नांकित करणारे आहे.
सुदैवाने परिसरातील जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखत बाळाचा जीव वाचवला. मात्र प्रश्न असा आहे की ही घटना घडते तरी कशी? प्रशासन झोपेत होते का? महिला व बालसुरक्षेच्या गप्पा मारणारी यंत्रणा नेमकी कुठे गायब होती?
आज “बेटी बचाओ”चे फलक लावणारे, योजना जाहीर करणारे प्रशासन प्रत्यक्षात मात्र अशा घटना रोखण्यात पूर्णतः अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ही घटना अपघात नाही, तर सामाजिक आणि प्रशासकीय अपयशाचा जिवंत पुरावा आहे.
🔴 ठोस मागण्या:
या अमानवी कृत्यात सहभागी असलेल्या मातेसह सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी.
परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून उदाहरणार्थ शिक्षा देण्यात यावी.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी व नवजात बालकांसाठी प्रभावी संरक्षण यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी.
जर प्रशासनाने या प्रकरणात चालढकल, दिरंगाई किंवा ढिसाळ चौकशी केली, तर नागरिक, महिला संघटना व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, याची जबाबदारी पूर्णतः प्रशासनाची असेल.
पांढरकवड्याची ओळख अशी अमानवी घटनांमुळे नव्हे, तर दोषींना कठोर शिक्षा देऊन निर्माण होणाऱ्या न्यायामुळे व्हावी, हीच जनतेची ठाम मागणी आहे.












