“आपले सरकार” सेवा केंद्र की गरीबांची लूट केंद्र?

0
488

“आपले सरकार” सेवा केंद्र की गरीबांची लूट केंद्र ?

झरीजामणी येथील सेतू चालकाकडून उघड आर्थिक शोषण

सेतू केंद्र तात्काळ रद्द करून दुकान सील करण्याची मागणी.

राजू तुरणकर – वणी विधनासभा क्षेत्रातील झरी जामणी येथे कार्यरत असलेले अमोल पुंडलिक मंचलवार यांचे आपले सरकार सेवा केंद्र हे नागरिक सेवेऐवजी गरीब व कष्टकरी नागरिकांची खुलेआम आर्थिक लूट करणारे केंद्र बनल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जातीचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नियमबाह्य, अवैध व बेकायदेशीर रक्कम वसूल करण्यात आल्याचा ठोस आरोप करण्यात आला आहे.

 

या प्रकरणातील तक्रारदार संजय तुकाराम उपरे (रा. सराटी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) हे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गरीब नागरिक असून, त्यांनी दिनांक 01/01/2026 रोजी झरीजामणी येथील वरील सेवा केंद्रावर जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला होता.

“पैसे दिले तरच प्रमाणपत्र” – उघड सौदेबाजी….सदर सेतू चालकाने तक्रारदारास —5–6 दिवसांत प्रमाणपत्र हवे असल्यास ₹ 600, 2–3 दिवसांत हवे असल्यास ₹1200, अशी थेट सौदेबाजी केल्याचा आरोप आहे.

पैशांची व्यवस्था नसतानाही तक्रारदाराने मजबुरीने —

₹100 नगद, ₹400 ऑनलाईन, नंतर पुन्हा ₹ 600 ऑनलाईन असे एकूण पैसे दिल्यानंतरच जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रतिज्ञापत्रासाठीही लूट- इतकेच नव्हे तर प्रतिज्ञापत्रासाठी सेतू चालकाची पत्नी  रजनी अमोल मंचलवार यांनी आधी ₹100 घेतले, नंतर “पैसे कमी आहेत, कुठूनतरी उसने आणा” असे सांगून पैसे परत केले आणि शेवटी ₹200 घेतल्याशिवाय प्रतिज्ञापत्र दिले नाही, हा प्रकारही गंभीर आहे.

गरीबांचा अपमान, प्रशासनाची भीती नाही, सदर सेतू चालकाची भाषा उर्मट, धमकीवजा व अपमानास्पद असून, गरीब नागरिकांशी तो उद्धटपणे वागतो.

त्याच्या वागणुकीतून त्याला कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट दिसून येते, ही बाब प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे.

थेट सवालजर “आपले सरकार” सेवा केंद्रावरूनच नागरिकांची अशी लूट होत असेल, तर प्रशासन कुठे आहे?. गरीब जनतेला न्याय कुणाकडे मागायचा?  अशा सेतू चालकांना कोणाचे संरक्षण आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर खालील मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात  अमोल पुंडलिक मंचलवार यांचे आपले सरकार सेवा केंद्र तात्काळ रद्द करण्यात यावे.संबंधित दुकान तात्काळ सील करण्यात यावे. अवैध रक्कम वसुली प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अशा प्रकारे जनतेची लूट करणाऱ्या इतर सेतू केंद्रांचीही सखोल चौकशी करण्यात यावी.

या तक्रारीसोबत ऑनलाईन व्यवहाराच्या पावत्या व संबंधित व्हिडिओ पुरावे जोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे.

गरीब, कष्टकरी नागरिकांची लूट थांबवण्यासाठी आणि “आपले सरकार” या योजनेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तात्काळ व कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here