प्रजासत्ताक दिनी निंबाळा येथे वैचारिक क्रांतीची हळदी-कुंकूवाट..

0
413

प्रजासत्ताक दिनी निंबाळा येथे वैचारिक क्रांतीची हळदी-कुंकूवाट..

महिलांच्या हाती शोभेच्या वस्तू नव्हे, विचारांची शस्त्रे देण्याचा निर्धार..

राजू तुरणकर – संपादक.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निंबाळा येथे गावातील सर्व महिला बचत गट व माता-भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र हा कार्यक्रम केवळ औपचारिकता न राहता, महिलांमध्ये वैचारिक जागृतीची ठिणगी पेटवणारा ठरला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्या सावित्रीबाईंनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्याच भारतात आजही महिलांना केवळ शोभेची वस्तू देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न होतो — यालाच निंबाळ्याच्या महिलांनी ठाम नकार दिला, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या वेळी सरपंच सुनीताताई ढेंगळे व वृषाली प्रवीण खानझोडे (माजी उपसभापती, पं. स. वणी) यांच्या हस्ते महिलांना समाजसुधारक व महानायकांच्या विचारांचे पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना वृषालीताई खानझोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले —
“भेटवस्तू काही दिवस कपाटात राहते, पण पुस्तक आयुष्यभर विचार बदलते. एका महिलेला विचार दिला, तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडते. म्हणूनच २०१२ पासून वणी पंचायत समिती अंतर्गत आम्ही महापुरुषांचे विचार महिलांपर्यंत पोहोचवण्याची चळवळ सातत्याने राबवत आहोत.”
उखाणे स्पर्धेसह झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा कार्यक्रम केवळ हळदी-कुंकू न राहता, “स्त्री ही केवळ परंपरेची वाहक नसून परिवर्तनाची शक्ती आहे” हे ठणकावून सांगणारा ठरला.


आज राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा होत असताना, निंबाळा गावातील महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून वैचारिक क्रांतीचा मार्ग निवडला आहे.
हे केवळ कार्यक्रम नाही — ही सुरुवात आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका सुरेखाताई नीत, माजी सरपंच किरणताई कुत्तरमारे, सुनीताताई चीडे, सविताताई भिलभिले, प्रणालीताई कुत्तरमारे, दर्शना ताई आसेकर, विजयाताई आसेकर, साधनाताई तुराणकार, रंजनाताई आत्राम, कविताताई ठाकरे, वनिताताई आसेकर, सुरेखाताई पिंपळशेंडे, भारतीताई खंडाळकर, संगीताताई दूधकोहळी, अर्चनाताई दुधकवळे यांच्यासह असंख्य महिलांनी मोलाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाला गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या आणि निंबाळ्यातून महिलांच्या वैचारिक लढ्याचा स्पष्ट इशारा दिला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here