लोधा सोलर प्लांट विरोधात अडेगावच्या शेतकऱ्यांचा तीव्र संताप.

0
420
लोधा सोलर प्लांट विरोधात अडेगावच्या शेतकऱ्यांचा तीव्र संताप.
शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बेकायदेशीर बंद – प्रशासनाची उदासीन भूमिका.
२७ जानेवारीपर्यंत रस्ता खुला न केल्यास २८ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा.

राजू तुरणकर – संपादक.

मौजा अडेगाव, खंड क्रमांक–१, सर्व्हे नंबर ५१ येथील शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांपासून वापरात असलेला वहिवाटीचा रस्ता लोधा सोलर प्लांट प्रशासनाने बेकायदेशीररित्या बंद केल्यामुळे परिसरातील तब्बल ४० शेतकरी आपल्या शेतात जाण्यापासून वंचित झाले आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर सरळसरळ घाला घालण्याचा प्रयत्न आहे.
परिसरातील जंगली पडीत शासकीय जमीन झरी–जामणी येथील तहसीलदारांनी लोधा सोलर प्लांट कंपनीला सौरऊर्जा प्रकल्पासाठी लीजवर दिली आहे. मात्र या परवानगीचा गैरवापर करत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला असून, शेतकऱ्यांचा पारंपरिक रस्ता बंद करून शेतकऱ्यांचे हाल सुरू केले आहेत. त्यामुळे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

दि. १५/०१/२०२६ रोजी अडेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार, झरी–जामणी यांच्याकडे रस्ता तात्काळ खुला करून देण्याबाबत वारंवार विनंती केली. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाची शेतकरीविरोधी उदासीनता स्पष्ट होत आहे.
दि. १६/०१/२०२६ रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शेतात जाण्याचा मार्ग मोकळा ठेवण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले होते. तरीसुद्धा लोधा सोलर कंपनीने रात्रीच्या अंधारात काम करून तो रस्ता पुन्हा बंद केला, म्हणजेच शासनाच्या आदेशालाच थेट आव्हान दिले आहे.
या प्रकारामुळे अडेगाव येथील शेतकरी गंभीर संकटात सापडले असून पिके, शेतीकाम आणि उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासन यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
🔴 तसेच सदर कंपनी समोरून जाणारा रस्ता दिवाकर दादाजी काळे या शेतकऱ्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बंद केला असून, ते अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
🔴 इशारा… जर दि. २७/०१/२०२६ पर्यंत सदर रस्ता खुला करून देण्यात आला नाही, तर अडेगाव येथील शेतकरी दि. २८/०१/२०२६ रोजी सर्व 40 शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर काहीही अनुचित घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, याची स्पष्ट नोंद घेण्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. हक्काचा रस्ता मिळेपर्यंत लढा सुरूच राहील! — अडेगाव येथिल एक शेतकरी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here