“गणेश गृहनिर्माण सोसायटी” प्रकरणात मोठी कारवाईची शक्यता?

0
868

“गणेश गृहनिर्माण सोसायटी” प्रकरणात मोठी कारवाईची शक्यता?

दप्तर जप्त… बँक व्यवहार गोठणार?  संबंधितांवर जेलवारीची टांगती तलवार !

राजू तुरानकर –  संपादक.

वणी येथील श्री गणेश गृहनिर्माण सहकारी सोसायटी, रजिस्टर नं. 1141 संदर्भातील राजु तुरानकर यांनी केलेल्या गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेच्या तक्रारीनंतर सहकारी संस्था विभागाने अखेर या प्रकरणाची दखल घेतली असून 6 मे 2026 रोजी वणी कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर सोसायटीचे महत्त्वाचे दप्तर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पुढील काळात बँक व्यवहारांवरही निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजु तुरानकर यांनी काढलेल्या माहिती अधिकारांतर्गत प्राप्त कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचा दावा तक्रारदारानी केला आहे. संस्थेच्या अधिकृत नकाशात एकूण 53 प्लॉट दाखविण्यात आले असताना विविध ऑडिट अहवालांमध्ये प्लॉट संख्येबाबत गंभीर तफावत आढळून आली आहे. सुरुवातीच्या ऑडिटमध्ये 2 प्लॉट शिल्लक दाखविण्यात आले, तर 2024-25 च्या ऑडिटमध्ये अचानक 4 प्लॉट शिल्लक दाखविण्यात आल्याने “नेमके प्लॉट गेले कुठे?” असा सवाल उपस्थित होत आहे.

इतकेच नव्हे तर, सोसायटीच्या खुल्या जागेवर प्रत्यक्षात कोणतेही गणेश मंदिर अस्तित्वात नसताना “गणेश मंदिर खर्च” दाखवून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या खर्चाच्या नावाखाली निधी वळविण्यात आला का? याचीही चौकशी होणार असल्याचे समजते.

प्लॉट विक्री व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क संस्थेकडून भरल्याचे दाखविण्यात आले असून हे कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार करण्यात आले, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे 2006, 2007 आणि 2008 चे ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

तक्रारदारांनी संस्था स्थापन झाल्यापासून ते 2024-25 पर्यंतच्या सर्व व्यवहारांचे पुनः ऑडिट करण्याची मागणी केली आहे. सहकारी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत असून पुढील टप्प्यात आर्थिक व्यवहारांची चौकशी, बँक खात्यांची तपासणी आणि संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुनावणीनंतर वणी शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून “दप्तर जप्तीनंतर आता पुढे कोण?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाग 2 मध्यें – ऑडिटर / ऑडिट कंपन्या बोगस.

भाग 3 मध्यें –  सचिव/अध्यक्ष यांचे कारनामे.

भाग 4 मध्यें – प्रशासनाची भूमिका 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here