वणी शहरातील अमृत 2.0 पेयजल योजनेच्या अंमलबजावणी तीलअनागोंदी कारभाराची त्वरित चौकशी करा – संजय निखाडे शिवसेना जिल्हाप्रमुख.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाची वेळ घेऊन मुख्याधिकारी गैरहजर. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित..
राजु तुरणकर – संपादक.
- वणी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या अमृत 2.0 पेयजल योजनेची एकूण अंदाजित किंमत सुमारे 140 कोटी रुपये असून, ही योजना शहराच्या जलपुरवठा दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण व दीर्घकालीन उपाययोजना दृष्टिकोनातून, सदर योजनेच्या अंमलबजावणीत विविध अनियमितता व कार्यपद्धतीतील भोंगळ कारभार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्या निदर्शनात आल्याने, त्यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
“हेड टू टेल” या तांत्रिक निकषांचा भंगः कोणतीही पाणीपुरवठा योजना सुरू करताना प्रथम पाण्याचा स्रोत, त्यानंतर फिल्टर प्लांट, जलकुंभ आणि शेवटी पाईपलाईन टाकणे आवश्यक असते. परंतु सदर ठिकाणी पाईपलाईनचे काम सर्वप्रथम सुरु करण्यात आले आहे, जे नियोजनशून्य असल्याचे स्पष्ट होते. नुकत्याच बांधलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे नुकसानः नव्याने तयार केलेले सिमेंट काँक्रीट रस्ते फोडून पाईप टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात अपार त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्यांचे पुनर्बाधकाम अद्याप झालेले नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय व दुहेरी खर्च होत आहे.अनावश्यक व पक्षपाती पद्धतीने रस्त्यांची निवडः शहरात अनेक प्रस्तावित रस्ते असूनही जुन्या रस्त्यांना वगळून नव्याने बांधलेल्या रस्त्यांवरच पाईपलाईनचे काम होत असल्याने नियोजनात पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. स्वतंत्र कन्सल्टंट नेमणूक करून मनमानी कारभारः पालिका प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक असताना कंत्राटदाराने स्वतःचा कन्सल्टंट नेमून काम सुरु केल्यामुळे नियामक नियंत्रण झपाट्याने कमी होत आहे. पूर्वानुभवाच्या पार्श्वभूमीवर शंकाः दहा वर्षांपूर्वी पासून सुरू असलेली यवतमाळ शहरातील अमृत योजना अद्याप पूर्ण न झाल्याचा अनुभव लक्षात घेता, वणी शहरात सुद्धा शेवटचे काम आधी करून उर्वरित काम होईल की नाही, याबाबत वणी शहरातील नागरिकांत विविध चर्चेला उधाण आले असून कामाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी
अ) सदर अमृत 2.0 योजनेचे काम पूर्णपणे पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या शिस्तबद्ध व विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे.ब) या योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी तात्रीक दृष्ट्या सक्षम अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी.क) कामाचे ऑडिट, तांत्रिक परीक्षण व पालिका प्रशासनाचे नियंत्रण सुनिश्चित करण्यात यावे. ड) नागरिकांच्या सहकार्याने योजनेचा आढावा घेणारी जनसुनावणी आयोजित करण्यात यावी. अशा मागण्या शिवसेना पक्षाच्या वतीने कामात अनियमित्ता दिसून येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मागण्या करण्यात आल्या असुन तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. याबाबत सकारात्मक कार्यवाही कराल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी संजय निखाडे जिल्हाप्रमुख, गणपत लेडांगे विधानसभा संघटक, संतोष कुचनकर तालुका प्रमुख,अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख, राजु तुरणकर, विनोद ढुमणे शहर प्रमुख, अजय चन्ने, मनिष बत्रा राजीव पाटील, आनंद घोटेकर,शेख शाबीर,प्रकाश कऱ्हाड,किशोर मा. गोधकार, नारायन तीरानकर , राहुल कोलते व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
वेळ घेऊनही मुख्याधिकारी सुट्टीवर… अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून आदल्या दिवशी वेळ घेतला तरीसुद्धा मुख्याधिकारी मात्र वेळेवर गायब झाल्याने सदर कामासंदर्भात अनेक प्रश्न व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली वरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वणी शहरातील सर्व नागरिकांना घरोघरी पाणी विकत घेऊन यावं लागत आहे. ही शोकांतिका आहे. पाणीपुरवठ्याचा अतिशय निकृष्ट दर्जा वणीकर नागरिक सहन करत आहे. मागील काळात झालेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची व दर्जाहीन नागरिकांच्या उपयोगाची नसून ती कामे केवळ मलिंदा लुटण्यासाठी होती हे सिद्ध झाले आहे. मग ती पाणीपुरवठ्याची असो रस्त्याची असो स्वच्छतेची असो केवळ केवळ निवडणुकीचा दृष्टिकोन समोर ठेवून लोकांना भुरळ घालण्यासाठी बेगडी स्वरूपाचे कामे केल्याने त्या कामांचा जनतेला काहीही उपयोग होताना दिसत नाही… वणी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी अमृत पेय जल योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून भविष्यातील पन्नास वर्ष या शहराचा पाणीपुरवठा ठरवणारी ही महत्त्वपूर्ण योजनाआहे , या योजनेच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी वेळ घेऊनही मुख्याधिकारी जर हजर नसेल तर या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो- संजय निखाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख.












