नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची स्थापना.
नरेंद्र तराळे अध्यक्षपदी.
राजू तुरणकर वणी : मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर वणी नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा माजी अभियंता नरेंद्र तराळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या सभेत नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी नरेंद्र तराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी खुशाल भोंगळे कर अधीक्षक, सचिवपदी राजेंद्र जयस्वाल, कोषाध्यक्षपदी अनिल कांबळे लेखापाल , तर सहसचिवपदी संजय दखणे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून तुळशीराम गाताडे, मोहन नायगावकर, केशव खापणे, मुरलीधर कुत्तरमारे, दिगंबर देशमुख, आबा सालकाडे व साधना रामगिरवार यांची निवड करण्यात आली.

नरेंद्र तराळे हे वणी नगरपरिषदेत जलपूर्ती , नियोजन व विकास विभाग अभियंता म्हणून कार्यरत होते. ते अत्यंत अनुभवी, अभ्यासू व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना निश्चितच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे संघर्ष उभा करून न्याय मिळवून देईल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ संघटनेला निश्चितच होईल, असेही मत यावेळी मांडण्यात आले.
सभेचे संचालन अनिल कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खुशाल भोंगळे यांनी केले. चहापानानंतर सभा संपल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र तराळे यांनी जाहीर केले.












