प्रभाग क्रमांक २ मधील नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण
खारकर गल्लीतील १५ वर्षांपासूनचा सांडपाणी प्रश्न मार्गी,
नगरसेविका रिता महेश पहापले यांच्या पाठपुराव्याला यश.
राजू तुरणकर – वणी
नगर परिषद वणी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील नागरी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांसाठी गंभीर ठरत होत्या. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित असलेल्या या समस्यांकडे नगरसेविका रिता महेश पहापले यांनी ठामपणे दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.
प्रभाग क्रमांक २ मधील खालील समस्यांबाबत तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती —
रवि निखाडे ते सुनील मोहितकर यांच्या घरापर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी अंडरग्राऊंड नालीचे बांधकाम.
प्रगती नगर येथील पाण्याच्या टाकीजवळील बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र (Water ATM) तात्काळ सुरू करणे.
प्रगती नगर येथील प्रा. महादेवराव खाडे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस तसेच पाण्याच्या टाकीजवळील ओपन स्पेस येथे साचलेला कचरा व वाढलेली झाडझुडपे हटवून संपूर्ण साफसफाई.
प्रभाग क्रमांक २ मधील दोन्ही ओपन जिम परिसर स्वच्छ करून नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण करणे.
विशेषतः खारकर गल्ली येथे गेल्या १५ वर्षांपासून भोंगळ कारभारामुळे सांडपाणी वाहून न जाण्याची गंभीर समस्या होती. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने दुर्गंधी पसरत होती तसेच घरांमध्ये पाणी शिरत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त होते.
या गंभीर बाबीची नगरसेविका रिता महेश पहापले यांनी नगर पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासमोर प्रभावीपणे मांडणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत आज अंडरग्राऊंड नालीच्या कामाला सुरुवात केली आहे.
कामास सुरुवात झाल्याने खारकर गल्लीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, “मागील पंधरा वर्षांपासून भोंगळ कारभारामुळे प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली,” अशी भावना व्यक्त केली आहे. नगरसेविका रिता पहापले यांच्या कार्यशैलीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व आभार व्यक्त केले आहेत.












