पठारपूर गावठाणे घोटाळा, तहसीलदार वणी यांचा आदिवासी बांधवांवर अन्याय.

0
557

पठारपूर गावठाणे घोटाळा उघड : नियम धाब्यावर, 11 प्लॉट बेकायदेशीर वाटप – ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.

वणी तहसीलदारांवर गावकऱ्यांचा मनमानी कारभार व आदिवासी बांधवांवर अन्याय केल्याचा आरोप. 

राजू तुरणकर – संपादक.
तालुक्यातील मौजा पठारपूर येथे गावठाणे भूखंड वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्याय विरोधात गावकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी वणी नितीन कुमार हिंगोले यांना निवेदन देऊन गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, 22 मार्च 2005 च्या अतिक्रमण यादीचा व 26 फेब्रुवारी 2015 च्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीचा पूर्णपणे बोजवारा उडवत, गट क्र. 21/1 मधील तब्बल 11 प्लॉट बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, शेतजमिनीची कोणतीही अधिकृत मोजणी न करता हे वाटप करण्यात आले असल्याने संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळेच्या पटांगणासाठी राखीव ठेवायचे भूखंडही न राखता सर्व प्लॉट ‘मनपसंत’ लोकांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, 1983-84 पासून संपादित झालेल्या गावठाणे जमिनींचे आजपर्यंत योग्य सीमांकन न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. रजनी बाळकृष्णा ढंगळे (30 गुंठे) व नानाजी विठोबा पहापळे (10 गुंठे) यांच्या शेतातून रस्ता गेला, मात्र शासनाकडून ना मोजणी झाली ना मोबदला मिळाला.
गावातील अतिक्रमण काढून टाकण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत, सधन व नोकरदारांना आर्थिक हितसंबंधातून प्लॉट देण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू व आदिवासी नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, “8 ते 10 दिवसांत न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला असून, या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पठारपुर येथील गावठाण जमीन वाटपात झालेल्या गैरप्रकार थांवण्यासाठी वणी तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांना स्मरण पत्र देण्यात आले.हे स्मरण पत्र देते वेळी माजी जिल्हा संघटक विजय गेडाम, उपतालुका प्रमुख धीरज राजूरकर, उपतालुका प्रमुख अनिल उलमाले, राजु तुरानकर माजी नगरसेवक, अजिंक्य शेंडे माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख, विकास गिरटकर विभाग प्रमुख युवासेना कायर, दादाजी बेलेकर, श्रीधर केराम, सुशांत नवले, उमेश चेडे,संदिप वाघमारे, मिलिंद बावणे, गणेश मांडवकर , प्रवीण पिसे उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here