पिकविम्यातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळले .

0
159

“पीक विम्यातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वगळला” — संतप्त शेतकरी, प्रशासनावर गंभीर आरोप!

अती पावसाने संपुर्ण पिके खराब होवून, उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा विमा नाकारणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल.

राजु तुरानकर – संपादक.

यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला असताना केवळ यवतमाळ जिल्हा वगळण्यात येणे हे शेतकऱ्यांच्या समजण्यापलीकडचे असून प्रशासनाचे अपयश की शासनाचा दुराग्रह असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड व रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एकमेव सुरक्षाकवच मानली जात होती. मात्र, हीच योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातील पहिल्या २५ दिवसांतच १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

“आता तरी शासनाने जागे व्हावे आणि यवतमाळ जिल्ह्याचा तात्काळ पुनर्विचार करून पीक विमा योजनेत समावेश करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी आणि वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.

नापिकिने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. उत्पादन नाही, उत्पन्न नाही, अतीपावसाने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाल्याचे विदारक वास्तव  चित्र सर्वांनी अनुभवले, आणि आता विमाही नाही. विम्याचे निकष काय, विमा कश्यासाठी, विमा नाकारण्याची कारणे काय, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संताप काँगेस तालुका अध्यक्ष वीकेश पानघाटे यांनी शासनाचे शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात व्यक्त केला आहे.

निवेदन देतेवेळी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी,जगदीश चौधरी,अशोक पांडे ,प्रफुल उपरे,अरुण नागतुरे ,मोरेश्वर वासेकर ,दादाराव चटप , अशोक सूर, अशोक चिकटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here