आंबेडकर जयंतीनिमित्त वणीत भीम गीतांचा जल्लोष

0
144

आंबेडकर जयंतीनिमित्त वणीत भीम गीतांचा जल्लोष.

सुरज अतिश यांच्या गीतांनी वणीत रंगणार प्रबोधनाचा मेळावा.

राजु तुरणकर – संपादक.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वणी येथे भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे प्रबोधनपर भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गव्हर्नमेंट हायस्कूल, पोस्ट ऑफिसजवळ, वणी येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील युवा व तडफदार गायक तथा प्रबोधनकार सुरज अतिश (नागपूर) व त्यांचा संच यांचे सादरीकरण होय. त्यांच्या जोशपूर्ण व विचारप्रवर्तक गीतांमधून सामाजिक समता, बंधुभाव व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला जाणार असून, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी वणी  किशोरजी गजलवार विराजमान राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संजयभाऊ खाडे व आशिष भाऊ खुलसंगे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमास परिसरातील आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, विषमता व अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा उद्देश असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून प्रबोधनपर संदेश आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमामुळे वणी शहरात आंबेडकरी विचारांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here