शिलालेखावरून वणीमध्ये संताप : अधिकाऱ्यांचा माज की राजकीय नेत्यांची नामुष्की?

0
1074

शिलालेखावरून वणीमध्ये संताप : अधिकाऱ्यांचा माज की राजकीय नेत्यांची नामुष्की?

विद्यमान आमदारांचे शिलालेखावर नावच नाही.

राजु तुरणकर – संपादक.

सावित्रीबाई फुले स्मारकाच्या अनावरणानिमित्त लावण्यात आलेल्या शिलालेखावरून वणी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. कामाला मंजुरी माजी आमदारांच्या कार्यकाळात मिळाली असली, तरी काम पूर्ण करून उद्घाटन विद्यमान आमदारांच्या हस्ते होत असताना शिलालेखावर मात्र केवळ माजी आमदारांचेच नाव झळकवण्यात आले आहे. हा प्रकार केवळ राजकीय शिष्टाचाराचा भंग नसून, इतर जनप्रतिनिधींचा सरळ अपमान असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्घाटक म्हणून विद्यमान आमदार व प्रमुख उपस्थितीती नगराध्यक्ष यांचा योग्य उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच कागदोपत्री शिष्टाचार पाळला, पण प्रत्यक्षात मात्र शिलालेखावरून तो जाणीवपूर्वक डावलण्यात आला का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
“अधिकाऱ्यांना राजकीय शिष्टाचाराचा विसर पडलाय की त्यांचा माजच वाढलाय?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. तीन-तीन वर्षांसाठी येणारे अधिकारी जर लोकप्रतिनिधींनाच जुमानत नसतील, तर वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय नेते केवळ दिखाव्यापुरतेच आहेत काय, अशीही बोचरी टीका आता उघडपणे केली जात आहे.
जाणकारांच्या मते, अशा नामफलकांवर मंजुरी देणारे माजी आमदार, उद्घाटन करणारे विद्यमान आमदार आणि शहराचे प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्ष— अशा सर्वांचा सन्मानपूर्वक उल्लेख असणे हीच प्रस्थापित व योग्य पद्धत आहे. मात्र, या घटनेत ती पद्धत जाणीवपूर्वक मोडीत काढल्याचे दिसत आहे.


या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “ही केवळ चूक आहे की ठरवून केलेली कृती?” याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे वणीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढे यावर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here