इंग्रजी शाळांना रेड कार्पेट, मराठी शाळांना कुलूप? शैक्षणिक धोरणाचा प्रताप !

0
389

इंग्रजी शाळांना रेड कार्पेट, मराठी शाळांना कुलूप? शैक्षणिक धोरणाचा प्रताप !

इंग्रजी शाळेचे नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात तर मराठी माध्यमांच्या शाळा बंद. हे काय नियोजित षडयंत्र ?

राजु तुरणकर – वणी 

राज्यातील शैक्षणिक धोरणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य देत मराठी माध्यम शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र आधीच सुरू झाले असताना, मराठी माध्यम शाळांच्या परीक्षा व निकाल प्रक्रियेमुळे प्रवेश उशिरा होत आहे. या तफावतीचा थेट परिणाम मराठी शाळांवर होत असून, पालक मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांकडे वळताना दिसत आहेत.
यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत असून, अनेक शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे. “हा केवळ योगायोग नाही, तर नियोजित षडयंत्र आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मराठी माध्यम शाळांमध्ये उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक कार्यरत असूनही त्या शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे, काही इंग्रजी माध्यम शाळांमध्ये कमी पात्रतेचे शिक्षक कमी वेतनावर काम करत असूनही त्या शाळांचा बोलबाला वाढताना दिसतो.
शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा “इंग्रजी माध्यम” हा केवळ आकर्षणाचा विषय बनला असून, यामुळे मराठी भाषा, संस्कृती व स्थानिक शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरिक व विविध संघटनांकडून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मराठी व इंग्रजी माध्यम शाळांचे शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू करावे, मराठी शाळांना विशेष प्रोत्साहन द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
या अन्यायकारक धोरणाविरोधात लवकरच तीव्र आंदोलन केल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी अस्मितेच्या गप्पा हाकणाऱ्या शासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here