गुटखा तस्करांना वणी पोलीस प्रशासनाचा अभय… युवासेनेचा आरोप.

0
158

वणी पोलीस गुटखा/तंबाखू तस्करांचे हितसंबंध जोपासत आहेत – युवासेनेचा गंभीर आरोप

वणी पोलिसांच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह.

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहरात सुरू असलेल्या तंबाखू तस्करी प्रकरणात वणी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद असून, पोलिसांचे तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा गंभीर आरोप युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी पंचशील नगर, वणी येथे जागरूक नागरिकांनी ‘११२’ क्रमांकावर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त केली होती. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मात्र, या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावरून पोलिसांची कार्यपद्धती संशयास्पद वाटत असून, तस्करांना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिले जात असल्याचे स्पष्टपणे  खालील मुख्य मुद्देवरुन दिसुन येत आहे.

वाहन जप्तीस जाणीवपूर्वक टाळाटाळ : गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले वाहन क्रमांक MH-24-BL-7051, त्याचा चालक व मालक यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे उपलब्ध आहे. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्ष साक्षीदार असतानाही १० दिवस उलटूनही वाहन जप्त करण्यात आलेले नाही, ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करते. तपासातील ‘अर्थपूर्ण’ दिरंगाई :वाहन जप्त न केल्यामुळे तस्करीमागील आर्थिक साखळी व मुख्य सूत्रधार उघड होण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून, आरोपींना वाचवण्यासाठी केलेली जाणीवपूर्वक दिरंगाई असल्याचा संशय बळावत आहे. तपास अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका :इतका गंभीर गुन्हा समोर असतानाही संबंधित तपास अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत निष्क्रिय आहे. त्यामुळे शहरात अशा बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांचेच पाठबळ मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

युवासेनेच्या ठाम मागण्या :

वाहन क्रमांक MH-24-BL-7051 तात्काळ जप्त करून वाहन मालक व चालकावर कठोर कारवाई करावी.

FDA ने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करावी.

तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या व वाहन जप्तीस टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे.

जर पुढील ४८ तासांत ठोस कारवाई झाली नाही, तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जनतेचा पोलिसांवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी वरिष्ठांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे अश्या आशयाचे निवेदन वणी पोलीस उपविभागाची तपासणी करण्यासाठी आलेले यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक यांना यावेळी वणी ठाण्यात देण्यात आले. जील्हा पोलीस अधीक्षकांनी दखल न घेतल्यास युवासेना पदाधिकारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख, आयुष ठाकरे, सुरेश शेंडे, उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here