यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चांनी वणीत राजकीय वातावरण तापले…

0
1038

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चांनी वणीत राजकीय वातावरण तापले…

पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष..

राजु तुरानकर – संपादक.

यवतमाळ विधानपरिषदेच्या प्राधिकारी मतदारसंघाच्या  [“प्राधिकारी” किंवा “स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी”] (विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे (नगर परिषद, नगर पंचायत) निवडून आलेले सदस्य मतदान करून आमदार (MLC) निवडतात.) निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून वणी शहरात मात्र वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

काँग्रेसकडून वणीतील मध्यवर्ती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष टिकराम कोंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाकडून माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तसेच माजी मंत्री मदन येरावार यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेनेत उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याने राजकीय रंगत अधिक वाढली आहे.

शिवसेनेत पालकमंत्री संजय राठोड यांचे निकटवर्तीय सलीम खेतानी (पांढरकवडा), तसेच पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक व संघटनात्मक पकड असलेले विजय चोरडिया (वणी) (झरी नगर पंचायतचे भक्कम पाठबळ) यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर “विदर्भातील दमदार ओबीसी चेहरा” म्हणून ओळख निर्माण करणारे किरण पांडव (नागपूर) यांचे नावही चर्चेत आले आहे. किरण पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये शिवसेना संघटनेची धुरा सांभाळत त्यांनी विदर्भात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संघटन कौशल्य, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवण्याची शैली यामुळे किरण पांडव यांची विदर्भातील शिवसैनिकांमध्ये मजबूत पकड असल्याचे बोलले जाते. विशेषतः ओबीसी समाजातील प्रभावी आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

विदर्भात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक आणि जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत किरण पांडव यांना विधानपरिषदेत संधी दिल्यास विदर्भात शिवसेनेचे संघटन अधिक वेगाने वाढण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पक्षवाढीसाठी सातत्याने सक्रिय राहणाऱ्या नेतृत्वाला पक्षश्रेष्ठी संधी देणार का, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या सर्व नावांमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात एकूण ४05 मतदार असून त्यात नगरपरिषद व नगरपंचायतीतील निवडून आलेले सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे. वणी नगरपरिषदेत ३०+ 3= 33 सदस्य असल्याने येथे प्रत्येक मताला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वणीतील राजकीय समीकरणांकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले असून आगामी काही दिवसांत उमेदवारीबाबत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय गणित पाहता शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून सुमारे 250 सदस्यसंख्या असल्याचा महायुतीने दावा केला आहे.त्यामुळे महायुतीचा पलडा सध्या जड मानला जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जवळपास निश्चित मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here