विधान परिषद निवडणुकीला नाट्यमय वळण; अपक्ष दावेदारीमुळे राजकारणात खळबळ; टिकाराम कोंगरे मैदानात.
महाविकास आघाडीची साहेबराव कांबळे यांच्या उपस्थितीत आज वणीत बैठक.
राजु तुरानकर – संपादक.
महविकास आघाडीकडून कडून साहेबराव कांबळे यांना यवतमाळ विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून आज दि. 29 मे रोजी ते वणी सायंकाळी पाच वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांचे घरी भेट देणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यवतमाळ विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या 18 जून रोजी होणार असून या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे 405 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वणी तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत टिकाराम कोंगरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी साहेबराव कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अशातच या निवडणुकीला आणखी नाट्यमय वळण मिळाले असून टिकाराम कोंगरे यांनी आज यवतमाळ येथे उमेदवारी अर्ज घेत आपली दावेदारी जाहिर केली.

अपक्ष दावेदारीमुळे राजकारणात खळबळ; टिकराम कोंगरे मैदानात.
काँग्रेसकडून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता टिकाराम कोंगरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.येत्या काही दिवसांत यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












