वणीतील “कोण तो लेखक/पत्रकार ज्याच्या भाग्यात संतांचे चरित्र लिखाणाचे सौभाग्य”
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
मराठी साहित्य आणि वारकरी संप्रदायाच्या अभ्यासविश्वात वणी शहरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. वणी येथील संत साहित्य अभ्यासक, लेखक व पत्रकार सुनील इंदू वामन ठाकरे यांच्या भाग्यात संतांचे चरित्र लिखाणाचे मोठे सौभाग्य लाभले आहे.
संत साहित्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या ठाकरे यांच्यावर संत कशिबा गुरव महाराज यांच्या जीवनकार्यावरील संशोधन व चरित्र लेखनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुषंगाने त्यांनी पंढरपूरजवळील गोपाळपूर येथे संत काशीबा गुरव महाराजांच्या समाधीस्थळी भेट देऊन तेथील इतिहास, परंपरा आणि उपलब्ध माहितीचा सखोल अभ्यास केला. यावेळी मंदिर संस्थानतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यापूर्वी ‘रिंगण’ विशेषांकासाठी त्यांनी संत काशीबा महाराजांवर लेखन केले असून, नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पुढील संशोधन आणि अधिकृत चरित्र लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

वारकरी संप्रदायातील संतांचे विचार, कार्य आणि जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वणीतील हा लेखक सातत्याने करत असल्याने साहित्य, सामाजिक आणि वारकरी क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.












