पटवारी-मंडळ अधिकाऱ्यांच्या कथित गैरव्यवहारावर पडदा ?
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करू नका अश्या आशयाचे पत्रामुळे खळबळ .
राजु तुरानकर – संपादक.
वणी तालुक्यातील एका प्लॉट फेरफार प्रकरणात पटवारी, मंडळ अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चुकीची नोंद व कार्यवाही केल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असताना उपविभागीय अधिकारी, वणी यांनी पोलीस स्टेशन वणी येथे पत्र पाठवून कारवाई टाळण्याचे निर्देश दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर पत्रामध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींचा उल्लेख असून, प्लॉट फेरफार व खरेदी व्यवहार संदर्भातील वाद महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रातील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय दंड संहिता व भारतीय नोंदणी अधिनियमाच्या काही तरतुदींचा आधार घेत संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा सूर दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.

तक्रारदारांच्या मते, संबंधित अधिकाऱ्यांनी फेरफार प्रक्रियेत नियमबाह्य काम करून जमीन व्यवहाराला वैधता देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी व फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना, उपविभागीय अधिकाऱ्यांचे पत्र हे संबंधित कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, जर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने पदाचा गैरवापर करून चुकीची नोंद, बनावट कागदपत्रे किंवा नियमबाह्य फेरफार केले असतील, तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणेला प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार असून, कोणत्याही प्रशासकीय पत्रामुळे फौजदारी तपास पूर्णपणे रोखला जाऊ शकत नाही.
दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागातील कार्यपद्धती, फेरफार प्रक्रिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी आता जोर धरत आहे.












