संशयास्पद मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित; तपासाची मागणी तीव्र.

0
1697

काय चालल वणी शहरात, कश्यामुळे गेला यश चा जीव.. संशयास्पद मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित; तपासाची मागणी तीव्र.

त्या हॉटेलची रूम कुणाचे नावावर बुक होति,सीसीटीव्ही फुटेज, वापरलेली गाडी तपास होणार……. शहरात जोरदार चर्चा..

राजु तुरानकर – संपादक

वणीतील तरुण यश सुगन कोचर राहणार साई नगरी वणी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एका आनंदी वातावरणात मित्रांसोबत वेळ घालवणारा तरुण काही तासांत मृत अवस्थेत आढळल्याने शहरात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित वणी वरोरा रोडवरील हॉटेलमधील रूम नेमकी कुणाच्या नावाने बुक करण्यात आली होती? रूम बुक करताना कोणती ओळखपत्रे जमा करण्यात आली होती? त्या वेळी यशसोबत कोण-कोण उपस्थित होते? याची माहिती तपासातून समोर येणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यश हॉटेलमध्ये कोणत्या वेळेला गेला, त्याच्यासोबत कोण होते, रात्रीदरम्यान काय घडले, तो स्वतः चालत बाहेर आला की त्याला इतरांनी बाहेर आणले, याचे सत्य सीसीटीव्हीमधून स्पष्ट होऊ शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

याशिवाय त्या तरुणाला हॉटेलमधून दवाखान्यात नेमक्या किती वाजता हलविण्यात आले? कोणत्या वाहनातून नेण्यात आले? रुग्णालयात दाखल करताना त्याची स्थिती काय होती? त्याच्यासोबत आलेले मित्र अचानक निघून का गेले? याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

नागरिकांच्या मते, ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून शहराच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने हॉटेल रजिस्टर, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, यशच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, “नेमके काय घडले?” हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

यशाच्या मृत्यूची शहरात जोरदार चर्चा…..

[ वणीतील सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुढे येणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.राजकीय पुढारी, समाजातील जबाबदार व्यक्ती आणि परिवारातील सदस्यांनी दुःखाला थोडे बाजूला सारून आपल्या मुलाच्या आत्म्याला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करावी अशी चर्चा आता जोर धरत आहे.]

[ जर वणी शहरात तरुणांमध्ये नशा, ड्रग्स  किंवा अन्य घातक प्रवृत्ती वाढत असतील, तर ही बाब केवळ एका ची नसून संपुर्ण तरूण पिढीसाठी अत्यंत गंभीर असून समाजाने याकडे दुर्लक्ष न करता जागरूकतेने पाहण्याची गरज आहे.या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आले, तरच त्याचा आत्म्याला खरा न्याय मिळेल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here