“CCTV मुळे चोरटे जेरबंद; सात मोटर चोरीनंतर अखेर आरोपी ऑन स्पॉट (तांडव) पकडला”
एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार; वणी पोलिसांत गुन्हा दाखल. गावकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक.
राजु तुरानकर – संपादक.
वणी तालुक्यातील पळसोनी परिसरातील श्रीराम प्लायवूड फॅक्टरीमध्ये सुरू असलेल्या मोटर चोरीच्या मालिकेला अखेर गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आळा बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. फॅक्टरी परिसरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रीराम प्लायवूड फॅक्टरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज कंपनी मालकाच्या मोबाईलवर सुरू होते. त्यावेळी फॅक्टरी परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. प्लायवूड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होताच कंपनी मालकाच्या भावाने तसेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी प्रत्यक्ष चोरी करत असलेल्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावकऱ्यांनी केलेल्या पाठलागात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला, तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पकडलेल्या आरोपीला नागरिकांनी थेट वणी पोलिसांच्या हवाली केले.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ ऋतिक उर्फ बंडू दुर्योधन (वय २६, रा. फुकटवाडी, वणी) याला ऑन स्पॉट पकडण्यात आले. तर आरोपी क्रमांक २ मुकेश विशंभर गुप्ता (वय २८, रा. काळे लेआऊट, वणी) हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या कंपनीतून तब्बल सात इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्याची माहिती समोर आली असून, या संदर्भात यापूर्वी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) व ६२ अन्वये गुन्हा क्रमांक ०३७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, गावकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून “CCTV आणि गावकऱ्यांची सतर्कता यामुळे मोठी चोरी टळली” अशी चर्चा परिसरात रंगली आहे.












