“१५ वर्षांचा अंधार दूर करण्यासाठी रणरागिणी मैदानात. प्रगतीनगर-बजरंगनगरमध्ये नवीन डी.पी.ची मागणी”
राजु तुरानकर – संपादक.
वणी शहरातील प्रभाग क्रमांक २ अंतर्गत प्रगतीनगर व बजरंगनगर परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून निष्क्रिय नगरसेवकाच्या कारभारामुळे कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील विद्यमान डी.पी.वर वाढलेला अतिरिक्त भार, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच दर पंधरा दिवसांत तब्बल दोन दिवस स्ट्रीट लाईट बंद राहण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत भाजपा नगरसेविका रिताताई महेश पहापळे यांनी पुढाकार घेत सहाय्यक अभियंता, विद्युत वितरण कंपनी, वणी शहर यांना निवेदन सादर करून परिसरात नवीन डी.पी. (रोहित्र) बसविण्याची मागणी केली. “निरंतर वीज योजना” अंतर्गत नवीन रोहित्र बसविण्याचे आश्वासनही यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, कमी दाबामुळे घरातील विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नाहीत. अनेकदा पंखे, फ्रिज, मोटार पंप यांसारखी उपकरणे बंद पडतात किंवा नुकसान होण्याची भीती निर्माण होते. रात्री स्ट्रीट लाईट बंद राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, प्रगतीनगर परिसरातील अनेक विकासकामे गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या “बॅकलॉग” कामांना गती देण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका रिताताई पहापळे यांनी प्रत्यक्ष जनसंपर्कातून विविध कामांना सुरुवात केली आहे. संपूर्ण वार्डामध्ये नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून प्रगतीनगरमधील पाण्याच्या टाकी जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडाझुडपे व घाण साफ करून मैदान स्वच्छ व सुंदर करण्यात आले आहे.
आता परिसराला उच्च दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा, स्ट्रीट लाईटची समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी नवीन डी.पी. बसविण्याची मागणी जोर धरत आहे.

यावेळी भाजपा वणी शहर सरचिटणीस आशिष डंभारे, भाजपा उपाध्यक्ष गणेश असुटकर, महेश पहापळे तसेच विवेक देशपांडे सर उपस्थित होते.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून प्रगतीनगर व बजरंगनगर परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी केली आहे.












