“जनता रांगेत… नगरसेवक बोलीत?” विधान परिषद निवडणुकीआधी ‘घोडेबाजार’ चर्चेने विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण तापले.

0
390

“जनता रांगेत… नगरसेवक बोलीत?” विधान परिषद निवडणुकीआधी ‘घोडेबाजार’ चर्चेने विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण तापले. नगरसेवक चिंताग्रस्त यावर्षी भेटणार की…..?

राजु तुरानकर वणी :- राज्यात एकीकडे वाढती महागाई, आर्थिक मंदी आणि उष्णतेच्या झळांनी सामान्य नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर होणाऱ्या या निवडणुकीत “घोडेबाजार” होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नगरसेवकांच्या मतांना यंदा “सोन्याचा भाव” मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगताना दिसत आहे — “जनता रांगेत उभी… आणि नगरसेवक बोलीत?” महागाईमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. पाणी, रोजगार, शेती आणि दैनंदिन प्रश्नांनी जनता होरपळत असताना मतांसाठी पैशांची उधळण होणार असल्याच्या चर्चेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “जनता प्रश्नांसाठी धडपडतेय आणि राजकारणी मतांच्या व्यवहारात व्यस्त आहेत,” अशी बोचरी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील विधान परिषद मतदारसंघावर यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून आजही शिवसेनेचाच या जागेवर प्रबळ दावा मानला जात आहे. पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांनी यवतमाळ विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा अधिकार असल्याचे सांगत आपला दावा केला आहे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी आमची सदस्य संख्या जास्त त्यामुळे आमचा अधिकार असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी निर्णायक भुमिका लवकरच घेतली जाईल .

मात्र स्थानीक स्वराज्य संस्थांमधील 108 भाजप, 98 शिवसेना शिंदे व 25 अजित पवार राष्ट्रवादी अशी एकुण 226 भक्कम सदस्य संख्येच्या जोरावर महायुतीकडून हा गड कायम राखण्यासाठी जोरदार रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय गणिते आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अपक्ष नगरसेवकांना या निवडणुकीत डावलण्याची खेळी सुरू असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. काही नगरसेवकांच्या “मनात मुरमुऱ्याचे लाडू फुटत” असले तरी अंतिम क्षणी राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, जर निवडणूक एकतर्फी झाली किंवा मतांसाठी आर्थिक व्यवहारांच्या चर्चा अधिक रंगल्या, तर जनतेचा रोष उफाळून येऊ शकतो. त्यामुळे “लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. मात्र काही कार्यकर्ते निवडणुकीत रंगत आणण्यासाठी “बुजगावणे उमेदवार” उभे करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, सामान्य जनतेतून आता वेगळीच मागणी पुढे येत आहे — “पक्षीय घोडेबाजारापेक्षा सामान्य माणसाला उमेदवारी द्या… किंवा निवडणूक बिनविरोध करा!”

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून महायुती हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी नेमकी कोणती रणनीती आखते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here