नागपुरात शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा, सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश.
नागपूर चारही बाजूंनी जाम, वाहतुकीची प्रचंड कोंडी , शेतकरी म्हणतात सात बारा कोरा केल्याशिवाय जाणार नाही. नागपूर कर जनताही शेतकऱ्यांच्या पाठीशी.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
मंगळवारी विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा धडकला आणि त्यामुळे वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. नागपुरातील बाहेर जाणाऱ्या व वर्धा-चंद्रपूरहून नागपुरात येणाऱ्या हजारो नागरिकांचा याचा मोठा फटका बसला. दुपारपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक खोळंबल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि त्यांना अकारण मन:स्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचे देखील तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. याचा चांगलाच मनस्ताप नागपूर कर जनतेला भोगावा लागत आहे.सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या मनात असलेला प्रचंड आक्रोश या मोर्च्यात दिसुन येत असून अलीकडील काळात एव्हढ्या मोठ्या स्वरूपाचे आंदोलन खुप वर्षांनंतर पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होईल अशी अपेक्षा अगोदरपासूनच होती. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होती. त्यानंतर हळूहळू वर्धा येथून शेतकरी आंदोलक मोर्चा बुटीबोरी व तेथून पुढे पोहोचू लागले.त्यामुळे वर्धा मार्गावर वाहतूकीचा वेग संथ झाला. दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक जामठ्याच्या अगोदर असलेल्या कापूस संशोधन केंद्राजवळील आंदोलनस्थळाजवळ शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. याचा फटका वाहतूकीला बसला. काही मिनिटांतच शेकडो वाहने कोंडीत अडकली. त्यानंतर कोंडी वाढतच गेली व अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. आंदोलक समृद्दी महामार्गावर पोहोचू नये यासाठी पोलीसांनी समृद्धीच्या आरंभबिंदूकडे जाणारा मार्गही पूर्णतः बंद केला होता. पण आंदोलकांची असलेली प्रचंड मोठ्या संख्येने सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.
नागपूर कर व जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी.
वर्धेसह, चंद्रपूर, हैदराबादकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला होता. खाजगी बसेसने नागपुरकडे येणारे बरेच प्रवासी आऊटर रिंग रोड किंवा बस उभी असलेल्या ठिकाणीच खाली उतरले व पायपीट करत शहराकडे निघाले. ठिय्या आंदोलनस्थळापासून मेट्रो स्थानकदेखील दूर आहे या वाहतूक कोंडीत लहान मुले, वृद्ध व्यक्तीदेखील अडकले होते. याशिवाय काही महाविद्यालयांतील विद्यार्थी-शिक्षक, खाजगी कंपन्यांतील कर्मचारी सायंकाळी कोंडीत अडकले. तरीही ते या आंदोलनाचे समर्थन करताना दिसुन येत होते. आंदोलनामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र या आंदोलनामुळे सरकाराच्या शेतकरी विरोधी भूमिकेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. नागपूर कर जनता सुद्धा शेतकऱ्यांसोबत असल्याचे व आंदोलनाचे समर्थन करताना दिसुन येत होते.
शेतकरी, दिव्यांग यांच्या प्रलंबित मागण्या घेवून बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला, माजी आमदार बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत स्टरियंगवर बसून शेतकऱ्यांसी संवाद साधत नागपुरात दाखल झाले. व सात बारा कोरा केल्या शिवाय निघायच नाही असा सुर या आंदोलनात दिसून येत आहे.
या आंदोलनामुळे लोकशाहीत आपले अधिकार व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे सर्व अधिकार शेवटी जनतेच्या हातात आहे हे सिद्ध झाले व आदर्श लोकशाही गिळंकृत करु पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फार मोठा फटका बसला असून, सरकार शेतकऱ्यांसाठी झुकले नाही याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे नीच्छित.











