Home Breaking News कबड्डी स्पर्धा आजही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातच : संजय खाडे

कबड्डी स्पर्धा आजही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातच : संजय खाडे

0
161

कबड्डीची लोकप्रियता ग्रामीण भागामुळे टिकून – संजय खाडे
भालर येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन, देशभरातील संघ सहभागी.

राजू तुरणकर–संपादक लोकवाणी जागर.

वणी – कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, वाढलेला खेळ आहे. कबड्डीचा प्राचीन मुळापासून आधुनिक खेळापर्यंतचा प्रवास हा त्याच्या चिरस्थायी आकर्षण आणि अनुकूलतेचा पुरावा आहे. आज जगभरातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. प्रो कबड्डीने हा खेळ देशातील घरोघरी पोहोचवला. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आणि यात व्यावसायिकता आली. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी या खेळाकडे आता करिअर म्हणून पाहायला पाहिजे. असे मनोगत रंगनाथ निधी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले. भालर येथील सिताई नगरी येथे कबड्डीच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

दीप प्रज्वलन करून संजय देरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून  किरण देरकर, संजय देठे, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर वऱ्हाटे , सुनील वरारकर, जगन जुनगरी, फैजल बशीर खान, विनोद ढुमणे, हुसेन बाशा, बाबाराव हेपट, मोईन खान, भगवामन मोहिते, मनिष बतरा, विलास कालेकर, बनन वाटेकर यांच्यासह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

उद्घाटन पर सामना महिला गटातील खैरगाव विरुद्ध भालर यांच्यात झाला. खैरगाव येथील महिला संघाने विजयी सलामी दिली. महिलांचे सामने दोन दिवस रंगले. सोमवारी रात्री टीएसओ वणी आणि भोपाळ यांच्यात अंतिम सामना रंगला. यात टीएसो वणी संघ बाजी मारत विजेता ठरला. तर भोपाळ संघ उपविजेता ठरला. तिस-या क्रमांकावर देवठाणा वाशिम, तर चौथ्या क्रमांकावर मुंबईचा संघ राहिला. या स्पर्धेत देशभरातील 16 महिलांचे संघ सहभागी झाले आहे. मंगळवार दिनांक 2 जानेवारीपासून पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेला सुरुवात झाली. आणखी तीन दिवस कबड्डीचा थरार रंगणार आहे.

तीन गटात ही स्पर्धा होत असून यातील पहिला गट हा खुला पुरुष गट आहे. दुसरा गट 60 किलो पुरुष गट तर तिसरा गट हा महिलांचा आहे. खुल्या गटात पहिले बक्षिस हे 40 हजार, दुसरे बक्षिस 30 हजार, तिसरे बक्षिस 20 हजार तर चौथे बक्षिस 10 हजार रुपये आहे. 60 किलो पुरुष गटासाठी अनुक्रमे 30 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार तर महिला गटासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार व 7 हजारांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे.

जय गुरुदेव सेवा मंडळ भालर यांच्या वतीने, बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर यांच्या सहकार्यातून व स्व. हेमंत खंगार यांच्या स्मृती प्रित्यर्थ या तुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व भालर ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!