वेकोलीच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
कामचुकार सेप्ट्टी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, उकणी खदानित झाले भूस्खलन.
राजु तुरणकर – संपादक. लोकवाणी जागर.
भारत सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतील उकणी येथील कोळसा खाणीत घडलेल्या गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार संजय देरकर यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खाण परिसरातील सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
खाणीत घडलेला प्रकार हा मानवनिर्मित असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कामगारांकडून करण्यात येत असून, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वीही याच खाणीत पाण्याच्या प्रवाह फुटल्याची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही योग्य उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिकांनी आरोप केला की, लाखो रुपयांचे वेतन घेणारे अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून कामकाज पाहतात; मात्र प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीची पाहणी करत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी हजारो वेकोली कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आल्याची भावना कामगारांमध्ये आहे.

भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे झालेले भूस्खलन असल्याने जर जीवितहानी झाली असती तर या गंभीर बाबीला जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर जवाबदारी फिक्स करुन घटनेचे गांभीर्य ओळखून योग्य उपाय योजना केल्या तर च वेकोलिच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा अबाधित राहील.













