भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्यांची आता होणार जेलवारी ?”
अटकपूर्व जामिनासाठी धावपळ; अधिकारी बचावात. गावाचा 92 तरीहि नेते गप्प.
राजु तुरानकर वणी :-वडगाव (धंदीर) येथील बहुचर्चित भूखंड घोटाळ्याने आता स्फोटक वळण घेतले असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेपाचे धक्कादायक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. तब्बल दीड वर्ष तक्रारी दाबून ठेवणाऱ्या यंत्रणेला अखेर पत्रकारांच्या आक्रमक ठिय्या आंदोलनापुढे झुकावे लागले आणि शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटे फेरफार, बनावट सातबारा, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात मंडळ अधिकारी, तलाठी, अर्जनवीस आणि व्यवहारातील संबंधितांवर बीएनएस अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच काही आरोपी गायब झाल्याची चर्चा शहरात रंगली असून अटकपूर्व जामिनासाठी गुप्त हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पत्रकार सूरज चाटे आणि संध्या तरवटकर यांनी प्लॉट खरेदीसाठी लाखो रुपयांचा व्यवहार केला होता. फेरफार आणि सातबारा त्यांच्या नावावर करण्यात आला; मात्र पुढे संपूर्ण कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. मूळ मालक वेगळाच असल्याने हा सर्व प्रकार संगनमताने रचल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांनी कारवाई टाळल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी संतप्त पत्रकारांनी थेट वणी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन छेडत ठाणेदारांना धारेवर धरले. जवळपास पाच तासांच्या संघर्षानंतर अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

दरम्यान, तलाठीच्या बचावासाठी एसडीओ कार्यालयातून वणी पोलिसांना “कारवाई टाळा” अशा आशयाचे पत्र गेल्याची चर्चा अधिकच खळबळ उडवत आहे. सरकारी अधिकारी एकमेकांना वाचवण्यासाठी अधिकारांचा गैरवापर करीत आहेत का? कोणाच्या दबावाखाली कारवाई दाबली जात होती? या प्रश्नांनी आता नागरिक संतप्त झाले आहेत.

“वडगाव भूखंड प्रकरणात ज्यांनी श्रीखंड खाल्ले, त्यांची आता जेलवारी ठरलेलीच,” अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. राजकीय पुढारी एकमेकांची टांग ओढण्यात व्यस्त असताना सामान्य नागरिक मात्र फसवणुकीचे बळी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घोटाळ्यामागे आणखी मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील चौकशीत महसूल विभागातील आणखी काही चेहरे उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावाचा 92 तरीहि नेते गप्प..
[ गावातील संशयास्पद मृत्यू प्रकरण असो, अवैध वाहतुकीचे बळी असो, जुगार-मटका असो की भूखंड घोटाळे — वणीतील राजकीय पुढारी मात्र कायम गप्प असल्याचे चित्र आहे.]
प्रशासनावर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचा धाक उरलेला नसल्याने अधिकारी अक्षरशः सैराट झाल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा अनेक नेते स्वतःच्या “ॲड मॅनेजमेंट”मध्ये व्यस्त असल्याचा आरोपही आता उघडपणे केला जात आहे.
एकेकाळी राजकीय दबावामुळे चुकीच्या कामांना लगाम बसायचा; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अधिकारी मनमानी करत आहेत आणि सामान्य माणूस भरडला जात आहे.
“गावाचा 92 झाला तरी कुणाला काही घेणंदेणं नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागली आहे.












