“चला पुन्हा लहान होवूया एक दिवसांची शाळा शिकूया”…. अविस्मरणीय स्नेह मिलन सोहळा

0
530

“चला पुन्हा लहान होवूया एक दिवसांची शाळा शिकूया”…. अविस्मरणीय स्नेह मिलन सोहळा.. एकमेकांना भेटण्याच्या आतुरतेने आले आणि भलतेच….

“२४ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा… आदर्श हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न”

जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांचा सन्मान अन् मैत्रीचा अविस्मरणीय मेळावा; शाळेला वॉटर प्युरिफायर प्लांट व विद्यार्थ्यांना ५० स्कूल बॅगचे वाटप.

राजु तुरानकर – संपादक.

“चला पुन्हा लहान होऊया, एका दिवसाची शाळा शिकूया…” या भावनिक हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आदर्श हायस्कूल, वणी येथील सन 1996 ते 2002 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा बहुप्रतिक्षित “माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा” शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्री, संस्कार आणि गुरु-शिष्य नात्याचा अनोखा सोहळा अनुभवला.

“बॅक टू स्कूल” या संकल्पनेवर आधारित या विशेष कार्यक्रमात माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात रमले. वर्गातील खोडकर आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, शालेय जीवनातील गंमती-जमती आणि बालमैत्रीचे क्षण यामुळे संपूर्ण परिसर भावूक आणि आनंदमयी झाला होता. अनेकांच्या डोळ्यांत जुन्या दिवसांच्या आठवणींनी आनंदाश्रूही तरळले.

शाळेत जमा व्हायचं , ठरलं ते भेटीच्या आतुरतेने , मात्र इथे आल्यानंतर माणसाने जिवन जगताना कसा आदर्श ठेवला पाहिजे हा आदर्श त्यांनी कृतीतून दाखवून दिले, या स्नेहमिलन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असा वॉटर प्युरिफायर प्लांट शाळेला भेट देण्यात आला. हा उपक्रम माजी विद्यार्थी तथा गडचिरोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या सहकार्याने साकारण्यात आला. तसेच रुपाली कोसरकर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना ५० स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

याशिवाय संपूर्ण शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांना सरिका मिलामिले यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. दहावीमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान महादेव खडतकर (देव/भाई) यांच्या पुढाकारातून पार पडला.

कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे गुरुजनांचा सत्कार. जयसिंगजी गोहोकर, वल्लभकर सर यांच्यासह अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक श्री. पिदुरकर सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.

सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, समूह छायाचित्रण, जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचा उत्सव अनुभवायला मिळाला. उपस्थितांसाठी सकाळचा नाश्ता व दुपारच्या भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी माजी विद्यार्थी तथा गडचिरोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,

“हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नसून, जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि गुरु-शिष्य नात्याचा सन्मान करणारा भावनिक सोहळा आहे. शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यामुळेच आज प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहे.”

“जुने क्षण… नवी भेट… अविस्मरणीय स्नेह…” या घोषवाक्याने सजलेल्या या स्नेहमिलन सोहळ्याने आदर्श हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, जुन्या आठवणींनी भरलेले संवाद आणि भावनिक क्षणांनी हा सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

या अविस्मरणीय कार्यक्रमाच नियोजन पवन वर्मा, मिलिंद पावडे, सूर्यकांत पिदुरकर, मनोज मालेकर, विनोद गौरकर, प्रवीण गहोकर, महादेव खडतकर (देव/भाई), वैभव कुरलेवार, विशाल बोरकुटवार, संदीप बारसागाडे, एकनाथ ढवले, उदयमान कोल्हे, शिवशंकर बांदूरकर, संदीप धाबेकर, रवि घुले, मनोज काळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

हा स्नेहमिलन सोहळा केवळ एक कार्यक्रम न राहता, जुन्या आठवणी, मैत्री, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा अविस्मरणीय संगम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here