“आडनावाच्या राजकारणाचा बाजार, मेळावे की राजकीय कटकारस्थान?

0
613

“जात, नातं आणि आता आडनावाचा बाजार; लोकशाही की वैचारिक दिवाळखोरी?”

“आडनावाच्या राजकारणाचा बाजार, मेळावे की राजकीय कटकारस्थान? भर चौकात बॅनर लावून कार्यक्रमाचे प्रदर्शन.

वणी:- राजकारणात विचार, कार्य आणि जनसेवा यांना दुय्यम स्थान देत आता जात, नातेसंबंध आणि आडनावाच्या आधारावर समाजाचे तुकडे करण्याचा धोकादायक खेळ सुरू झाला आहे. त्यातही काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी केवळ स्वतःचे राजकीय महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी जाती-नात्यांचे मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला असून भर चौकात बॅनर लावून कार्यक्रमांचे प्रदर्शन केल्याने व असे मेळाव्याचे मागील काळात वारंवार आयोजण सूरू असल्याने या बद्दल जनतेच्या मनात चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुका जवळ आल्या की अशा मेळाव्यांच्या माध्यमातून विशिष्ट व्यक्तीला पुढे आणण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी वणी नगर पालिकेच्या निवडणुकी आधी वणी शहरात असाच कार्यक्रम घेण्यात आला होता. समाजातील लोकांना “आपला माणूस” या भावनिक जाळ्यात अडकवून विवेकबुद्धीऐवजी आडनाव आणि रक्तसंबंधांच्या नावावर मतदान करण्याचे विष पेरले जाते. प्रचारासाठी काही अविचारी मानसिकतेचे लोक मानवी बॉम्बसारखे समाजात फिरवले जातात आणि जातीय ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जातो.

आज ही मानसिकता इतकी बळावली आहे की भर चौकात बॅनर लावून अशा कार्यक्रमांचे खुलेआम प्रदर्शन केले जात आहे. “आपलं शेंबड असलं तरी आपलंच” ही मानसिकता रुजवून गुणवत्ता, कार्यक्षमता आणि समाजसेवा यांना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला अनेक कार्यकर्ते कोणताही जात-पात, धर्म किंवा नातेसंबंधाचा विचार न करता रात्रंदिवस जनतेसाठी झटत असतात. आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, संघटन बांधणी आणि लोकहिताची कामे करून ते समाजाला दिशा देत असतात. पण निवडणुकीच्या वेळी जातीय समीकरणांच्या माध्यमातून अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्याचे आणि पराभूत करण्याचे षडयंत्र रचले जाते.

जर प्रत्येक समाज, प्रत्येक नातेसंबंध आणि प्रत्येक आडनावाचे मेळावे राजकीय शक्तिप्रदर्शनासाठीच असतील, तर मग प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांनीही असेच मेळावे भरवायचे का? लोकशाहीचा पाया विचारांवर उभा राहणार की नातेसंबंधांच्या बाजारावर?

आमदार/ खासदार आडनावाचे मेळावे घेतील काय? आपल्या मतदार संघाचे आमदार आणि खासदार यांना सुद्धा आडनाव आहे मग त्यांनी असे आपल्या आडनावाचे लोक जमा करून मेळावे का घेऊ नये हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे. सार्वजनिक जिवन जगताना कृतिशील विचारांची गरज आहे. अश्या कार्यक्रमांना जबाबदार व्यक्तीने तरी खतपाणी घालू नये.

समाजात वैचारिक घाण पसरवणाऱ्या या प्रवृत्तींचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे. जनतेपर्यंत यामागील राजकीय हेतू, समाज विघटनाची भूमिका आणि लोकशाहीला लागलेली ही कीड पोहोचली पाहिजे. समाजाने व्यक्तीची जात, नातं किंवा आडनाव न पाहता त्याचे कार्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवा पाहून निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

लोकशाही वाचवायची असेल तर जातीच्या चौकटी मोडाव्या लागतील; अन्यथा उद्या मतपेटीतून विचार नाही, तर आडनाव जिंकत राहील. “जातीय मेळावे की लोकशाहीच्या छाताडावरचा घाव?” अश्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here