वणी येथील तंबाखू तस्करी प्रकरणातील आरोपींना अटक व वाहन जप्ती करा – युवासेना.

0
210

वणी येथील तंबाखू तस्करी प्रकरणातील आरोपींना अटक व वाहन जप्ती करा – अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख.

प्रजासत्ताक दिनी पोलीस प्रशासनाविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी शहरात उघडकीस आलेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आज एक महिना उलटूनही संबंधित आरोपींवर कोणतीही ठोस, परिणामकारक व कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक, गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केला आहे.
या प्रकरणातील तक्रारीत नमूद आरोपी एक महिन्याच्या कार्यकाळ लोटूनही आजपर्यंत मोकाटपणे समाजात वावरत आहेत, मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे.तसेच, गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरण्यात आलेले वाहन क्रमांक MH-24-BL-7051 हे अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा असूनही वाहन जप्त न होणे ही तपासातील गंभीर त्रुटी असल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालात तपास सुरू असल्याचे नमूद असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही. तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा संशय असून, यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी युवासेनेची ठाम मागणी आहे.
युवासेनेच्या मुख्य मागण्या :संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन त्वरित जप्त करावे.तपासात दिरंगाई करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे.
अंतिम इशारा :
या निवेदनाद्वारे प्रशासनास अंतिम संधी देण्यात येत आहे.
जर येत्या 7 दिवसांत वरील मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता वणी येथील तहसील कार्यालयासमोर युवासेनेतर्फे तीव्र ‘धरणे आंदोलन’ छेडण्यात येईल.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा युवासेनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here