वणी तालुक्यात “वारी प्रबोधनाची” उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात.

0
145

वणी तालुक्यात आजपासून “वारी प्रबोधनाची” उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

ध्येय समाजहिताचे….

वणी : ग्रामसमृद्धी, नैतिक मूल्यांची जोपासना, संतविचारांचा प्रसार व सामाजिक प्रबोधन या उदात्त हेतूने राबविण्यात येणाऱ्या “वारी प्रबोधनाची” या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला वणी तालुक्यात  मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. या वारीचा प्रारंभ परमडोह येथून होणार आहे.

आज सोमवार, दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता परमडोह येथील श्री नारायण बाबा देवस्थान येथे मान्यवरांच्या शुभहस्ते वारीचा शुभारंभ होणार आहे. यावेळी देवस्थानात विधिवत पूजा-अर्चा करून वारीस सुरुवात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मधुकर वाभिटकर, स्वागताध्यक्ष म्हणून  रुपलताताई निखाडे, उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे  उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून सप्त खंजिरी वादक व राष्ट्रीय किर्तनकार इंजी. भाऊसाहेब थुटे, मोझरी येथील श्रीगुरुदेव गुरुकुलचे संचालक रवी मानव, श्रीगुरुदेव युवा मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, युवा प्रबोधनकार राज घुमणार, तेलंगणा राज्याचे प्रचारक डॉ. उदार महाराज उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय निखाडे, विठ्ठल डाखरे महाराज, नेताजी पारखी, संतोष वऱ्हाटे, कवडू वडस्कर, संकेत गज्जलवार यांच्यासह परिसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

उद्घाटनप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ, उपासक-उपासिका, विविध भजन मंडळे, महिला भारुड मंडळे तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या वारीअंतर्गत गावोगावी संतविचारांचे प्रबोधन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर, भजन, कीर्तन, भारुड, प्रवचन तसेच सामाजिक विषयांवरील प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. स्वच्छता, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा, नैतिक मूल्ये, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

वारीच्या स्वागतासाठी तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली असून, ठिकठिकाणी रांगोळ्या, पताका, तोरणे व स्वागतफलक लावण्यात आले आहेत. वारीच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भक्तीमय व प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक जाणीव जागृत होत असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा नव्या पिढीपर्यंत प्रभावी प्रसार होत आहे. “वारी प्रबोधनाची” हा उपक्रम केवळ धार्मिक नसून, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र वणी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

वारी यशस्वी करण्यासाठी गावोगावी ग्रामस्थ व श्रीगुरुदेव भजन मंडळ परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here