वणी नगर परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष सह मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार.
राजू तुरणकर – संपादक.
वणी नगर परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुगेवार तसेच मुख्याधिकारी सचिन गाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नगर परिषदेच्या अध्यक्षा यांच्या कार्यालयात उत्साही वातावरणात पार पडला.

या सत्कारप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र तराळे (अभियंता, जलपुरवठा व नियोजन विभाग, न.प. वणी) बोलताना म्हणाले की, नगर परिषद हे एक मोठे कुटुंब असून कर्मचारी व सर्व नागरिक त्याचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या कल्याणाची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. शासनाने निर्धारित केलेल्या कायद्यांनुसार—महानगरपालिका अधिनियम १९६५, नगररचना अधिनियम १९६६ (डीसी रुल्ससह), नगरपालिका लेखा संहिता १९७२ व विविध उपविधी—यांच्या अंमलबजावणीतून नगर परिषदेची ओळख ठरते.

कुटुंब जसे संस्कारांनी ओळखले जाते, तसेच कायदेशीर व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे नगर परिषदेची विश्वासार्हता वाढते. तसेच आवश्यक असल्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा पुन्हा घेऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग केल्यास नगर परिषदेच्या प्रगतीस निश्चितच चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष खुशाल भोंगळे, कोषाध्यक्ष अनिल कांबळे, सचिव राजेश जयस्वाल, सहसचिव संजय दखने यांच्यासह तुळशीदास गाताडे, आबा सालकांडे, अशोक नायगावकर, बाळा देशमुख, मोहन नायगावकर, प्रकाश मैंदळकर, मुरलीधर कुत्तरमारे, बिहारी, वाढगुरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे उपमुख्याधिकारी जयंत सोनटके यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पेढ्याच्या गोडव्यात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले.












