वणीमध्ये ‘नमो उद्यान’ नामफलकाची मोडतोड; श्रेयवादावरून राजकारण तापले.
नगरपरिषद ही स्वायत्त संस्था उद्घाटनाला कुणाला बोलवायचे हे त्यांचे अधिकार, विरोध हा संविधानिक पद्धतीने केला पाहिजे- संजीव रेड्डी बोदकुरवार
वणी : शहरात नुकत्याच उभारण्यात आलेल्या नमो उद्यानच्या उद्घाटन नामफलकाची शिवसेना (UBT) कडून मोडतोड करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा सत्ताधाऱ्यांनी नामफलक पाडल्यावरुन विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “विकासाऐवजी केवळ राजकारण करणाऱ्यांची ही कृत्ये आहेत,” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. माहिती अशी की, नामफलकावर विद्यमान आमदारांचे नाव नसल्यामुळे काही विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातूनच हा संताप व्यक्त केला गेला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात श्रेयवादाची लढाई उफाळून आली असून, विकासकामांचे श्रेय घेण्यावरून राजकीय वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून निर्माण झालेला वाद हा फक्त नावाचा किंवा श्रेयाचा नाही, तर तो प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राजकीय संस्कृती यांच्यातील समन्वयाचा प्रश्न आहे.
नगरपरिषद ही स्वायत्त संस्था आहे, प्रोटोकॉल हा शासकीय कार्यक्रमात पाळावयाचा असतो, उद्घाटनाला कुणाला बोलवायचं हा नगरपरिषदेचा भाग आहे. विरोधकांनी प्रोटोकॉलचा विषय घेऊन नमो उधानाच्या ठिकाणी उद्घाटनासाठी लावण्यात आलेले बोर्ड यावरती नगराध्यक्ष यांचा फोटो होता, त्या फोटोला असंविधानिक पद्धतीने पाडून त्या उद्घाटन करणाऱ्या वॉर्डातील जनतेचा अपमान करण्यात आला. ही राजकीय परिपक्वता नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजीव रेड्डी यांनी केले आहे. त्यांनी उद्घाटन खुशाल करावे पण बोर्ड उपडून टाकणे हा अनुचित प्रकार असल्याचे मत व्यक्त केले. मी आमदार असताना मला सुद्धा स्थानीक उद्घटणात डावलले गेले होते, त्यावेळी आम्ही बोर्ड उपडून नाही तर आमच्या पद्धतीने राजकीय परिपक्वता दाखवत कामे केली – माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार.
लोकशाहीत मतभेद असू शकतात, नाराजी असू शकते; पण त्याची अभिव्यक्ती कायदेशीर आणि सन्मानपूर्वक मार्गानेच व्हायला हवी. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड ही केवळ कायद्याचा भंग नाही, तर समाजाला चुकीचा संदेश देणारी कृती आहे.
अशा प्रकरणांमध्ये बहुतांश वेळा “श्रेयवाद” (credit politics) हे मुख्य कारण असतं. कोणाचं नाव, फोटो किंवा उल्लेख नाही यावरून वाद निर्माण होतो. पण विकासकाम हे कुण्या एकट्या व्यक्तीचं नसतं — ते जनतेच्या पैशातून, प्रशासनाच्या प्रक्रियेतून आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून होत असतं.
हा सर्व प्रकार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर घडला असून, शासकीय नियमांची पायमल्ली होत असताना त्यांनी कोणतीही हरकत न घेतल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. विद्यमान आमदार यांच्या नावाला सातत्याने डावलले जात असल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून, याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने लावून धरली आहे. या प्रकरणाने वणीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.
मात्र वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सातत्याने मुंबई वाऱ्या करत असून ते ईथुन बदली करुन पळाच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.












