“नमो उधाण” बगीचा भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून वणीमध्ये, राजकीय तमाशा , तिसऱ्यांदा भूमिपूजन !
माजी-विद्यमान आमदार, आमने- सामने, वाद शिगेला.. वणीकरांचे मनोरंजन.
राजु तुरणकर – संपादक.
वणी : शहरातील आनंदनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या “नमो उधाण” बगीच्याच्या भूमिपूजन वरून राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि विद्यमान आमदार संजय देरकर यांच्यातील श्रेयवाद आता उघड संघर्षात परिवर्तित झाला आहे.
सुरुवातीला भाजपकडून नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या हस्ते बगीच्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात विद्यमान आमदारांना निमंत्रण न दिल्याने वादाची ठिणगी पडली. प्रोटोकॉलचा अवमान झाल्याचा आरोप करत “ईट का जवाब पत्थर से देंगे,” असा इशारा देत आमदार संजय देरकर यांनी आपली आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला होता..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांनी त्याच ठिकाणी पुन्हा भूमिपूजन करून राजकीय वातावरण आणखी तापवले.
दरम्यान, यानंतर हा वाद अधिकच चिघळला, जेव्हा भूमिपूजन साठी लावण्यात आलेल्या फलकाची मोडतोड करण्यात आली.भाजपकडून बोर्डाची मोडतोड या प्रकाराची गंभीर दखल घेत बैठक बोलावण्यात आली. व निषेध व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल पुन्हा तिसऱ्यांदा नव्याने माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी पुन्हा एकदा सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांना घेवून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आनंदनगर येथे वाजत-गाजत भूमिपूजन केले. व चॅलेंज स्वीकारल्याची नीती स्पष्ठ केली. मात्र आता यावर शिवसेना (UBT) कडून काय भुमिका घेतली जाईल याकडे वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषद ही स्वायत्त संस्था असल्याने, भूमिपूजनाच्या कार्यक्रमात कुणाला बोलवायच हा त्यांचा अधिकार आहे.हा शासकीय कार्यक्रम नव्हता त्यामुळे प्रोटोकॉल लागू होत नाही, असा दावा करत भाजपने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. मात्र, भूमिपूजन फलकाची मोडतोड ही गंभीर बाब असल्याचेही माजी आमदार संजीव रेड्डी यांनी अधोरेखित केले.
या सर्व घडामोडींमुळे वणी शहरात सध्या चांगलाच राजकीय रंगतदार माहोल निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, बगीचा पूर्ण होण्याआधीच सुरू झालेली ही राजकीय “करमणूक” नागरिकांसाठी चर्चेचा आणि मनोरंजनाचा विषय ठरत आहे.










