“सभासदत्वावरून गणेश गृहनिर्माण संस्थेत खळबळ; चेंडू सहकार निबंधकांकडे”
“रहिवाशांना वर्षानुवर्षे सभासदत्व नाकारले “आता चेंडू थेट सहकार निबंधकांच्या कोर्टात….
त्या नारदमुनी सचिवाच्या हट्टी स्वभावाने वाद चिघळला…
राजु तुरानकर – संपादक.
शहरातील श्री गणेश गृह निर्माण संस्थेमधील सभासदत्वाचा वाद आता अधिकच चिघळला असून, अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना सभासदत्व नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. तब्बल 35 रहिवाशांनी एकत्र येत सहकार विभागाकडे धाव घेतल्याने संस्थेतील अंतर्गत कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शहरातील एका गृहनिर्माण संस्थेमधील सभासदत्वाचा वाद आता अधिकच तापताना दिसत आहे. सोसायटीतील तब्बल 35 रहिवाशांनी एकत्र येत सहकार विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले असून, “आम्हाला जाणीवपूर्वक सभासदत्वापासून वंचित ठेवले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून संबंधित सोसायटीत वास्तव्यास असूनही त्यांना सभासद बनविण्यात आलेले नाही. काहींना तर नारद मुनी सचिवाने “तुम्हाला सभासद करणार नाही” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेचा कारभार नियम व कायद्याने चालतो की एखाद्या व्यक्तीच्या मनमानीने? असा सवाल आता संतप्त रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे, याच संस्थेबाबत यापूर्वीही प्लॉट संख्या, ऑडिट अहवाल, रस्ते, दप्तर जप्ती तसेच आर्थिक व्यवहारांबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले होते. त्यात आता सभासदत्वाचा मुद्दा पुढे आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
रहिवाशांनी दिलेल्या निवेदनानंतर सहकार विभाग नेमकी काय भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. “35 कुटुंबांना त्यांच्या हक्काचे सभासदत्व मिळणार का, की नारद मुनी सचिवाचा हट्टच कायम राहणार?” अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्ये सुभाष पाचभाई, दिपक जोगी, बंडू बोथले, शंकर उपरे, विनायक बोबडे, नारायण चटप, नत्थु चौधरी, राजू वाढई, मधुकर कोंगरे, भास्कर नांदेकर, भास्कर बोधडकर, रवी आगलावे, विलास कॉलर, कविता भोंगळे, लीलाधर धोबे, वैभव कौरासे, सुभाष कार्लेकर, संभा खारकर, सुनीता तोडसाम, बालाजी बोबडे, संजय शिंदे, राजेश शर्मा, सुरेश ठाकरे, नम्रता गाथाडे, अर्चना बल्की, रमेश खारकर, रुख्मिणी डोंगरकर, संजय बोंडे, सुभाष काकडे, मोहम्मद सहजाद, वसंत काकडे, गजानन पावडे, विजय बोबडे यांच्यासह अनेक रहिवाशांचा समावेश आहे.











