“‘बीट’चा अर्थच कळला नाही… आणि वणीकर झाले ‘बीट’!”
“वणीकर ‘बीट’ कॉईनच्या नादात फसले!”
“प्राध्यापक, डॉक्टरांनाही ‘बीट’चा अर्थ कळला नाही… आणि लाखोंना चुना!”
राजु तुरानकर – संपादक लोकवाणी जागर
“घरबसल्या कमवा”, “आज गुंतवा उद्या श्रीमंत व्हा”, “52 दिवसांत पैसे डबल” अशा गोड बोलांनी वणी शहरातील अनेक सुशिक्षित नागरिकांना ऑनलाईन बिटकॉईन ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढले असून आता मात्र अनेकांच्या हातात “डिजिटल धुपाटणे” आल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, DSJ Exchange नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून मोठे नेटवर्क तयार करण्यात आले. सुरुवातीला काहींना थोडाफार नफा मिळाल्याने “ही योजना खरीच असणार” असा समज निर्माण झाला आणि मग मित्र, नातेवाईक, सहकारी यांनाही यात ओढले गेले.

या “डबल पैशांच्या खेळात” प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, व्यापारी अशा उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित मंडळींचीही एंट्री झाली. काहींनी लाखोंची गुंतवणूक केल्याची चर्चा असून, सुरुवातीचा नफा पाहून अनेकांनी “बँकेपेक्षा बिटकॉईन भारी!” असा विश्वास ठेवत पुन्हा पुन्हा गुंतवणूक वाढवली.
मात्र सदस्यसंख्या वाढताच कंपनीचे नवे-नवे नियम समोर येऊ लागले. कधी “TDS भरा”, कधी “Account Verification Fee”, तर कधी “Platform Update Charge” च्या नावाखाली पैसे उकळले जाऊ लागले. “आता एवढे भरलेच आहेत तर अजून थोडे भरू” या मानसिकतेत अनेकांनी 12 टक्के अतिरिक्त रक्कमही जमा केली.तरीही पैसे परत मिळाले नाहीत.
उलट आता “नवीन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लॉन्च” केल्याचे सांगत पुन्हा 100 डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार रुपये भरण्याची अट टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सतत पैशांची मागणी सुरूच राहिल्याने काही गुंतवणूकदारांना संशय आला असून वणीतील काहींनी नागपूर सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्याची चर्चा आहे. शहरात आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही मिश्कील प्रतिक्रिया उमटत आहेत.
“इतरांना गुंतवणुकीचे धडे देणारेच स्वतः फसले…” “क्रिप्टोच्या नादात क्रेडिट गेले…” “डबल बोलकर चुना लगा दिया 30 हजार का…” असे स्टेट्स आणि टोले सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.विशेष म्हणजे “Bitcoin” मधील “Bit” म्हणजे डिजिटल युनिट असले तरी वणीत मात्र त्याचा अर्थच “फसवणूक” असा निघाल्याची उपरोधिक चर्चा रंगली आहे. “प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर यांनाही शब्दाचा अर्थ कळला नाही आणि तेही फसले,” अशी टीकाही नागरिकांमधून केली जात आहे.
कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या हव्यासापायी केवळ सर्वसामान्यच नव्हे तर उच्चशिक्षित लोकही अशा ऑनलाईन आमिषांना बळी पडत असल्याचे या प्रकारातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणतीही ऑनलाईन गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची शासकीय नोंदणी, अधिकृत परवानगी आणि आर्थिक व्यवहारांची सखोल खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.











