वारे विधानपरिषद निवडणुकीचे – अपक्ष दावेदारीच्या चर्चांना पूर्णविराम?
महाविकास आघाडीच्या बैठकीत एकीचे दर्शन; सर्व दिग्गज एकाच व्यासपीठावर.

वणी : यवतमाळ विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना काल वणी येथे झालेल्या बैठकीत काहीसा पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसून आले. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक ,प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने आघाडीतील एकीचे दर्शन घडले.
महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचे सुपुत्र यांनी वणी येथे घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारांशी संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यवतमाळ विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या 18 जून रोजी होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे 405 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या वणी तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टिकराम कोंगरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी साहेबराव कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच टिकराम कोंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेत अपक्ष दावेदारीचे संकेतदिले होते.मात्र कालच्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर, यांचे मार्गद्शनाखाली टिकाराम कोंगरे व्यासपिठावर असल्याने व आघाडीतील घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र दिसल्याने महाविकास आघाडीत एकी कायम असल्याचा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आता एकीला प्राधान्य दिले जाणार, असल्याने महायुतीचा उमेदवार कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, बैठकीत उपस्थित नेत्यांनी आगामी निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












