जीवघेण्या खड्ड्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; अपघाताची नागरिकांना भीती.

0
276

जीवघेण्या खड्ड्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; अपघाताची नागरिकांना भीती.

अपघाताची वाट पाहतोय प्रशासन ? नेते इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये व्यस्त.

राजु तुरानकर – संपादक.

वणी मार्गे मार्डी–वडकी या राज्य महामार्गावर वणी जवळील सोयाबीन फॅक्टरी परिसरातील पुलावर पडलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, अनेक महिन्यांपासून तो जैसे थे अवस्थेत असल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माहितीनुसार, वणी–मार्डी–वडकी–यवतमाळ या राज्य महामार्गावर वणीपासून काही अंतरावर असलेल्या सोयाबीन फॅक्टरीजवळील छोट्या पुलावर गोल आकाराचा मोठा खड्डा पडलेला आहे. पुलावर असल्यामुळे हा खड्डा जवळपास तीन ते चार फूट खोल असून, रात्रीच्या वेळी किंवा वेगात येणाऱ्या वाहनचालकांसाठी तो अधिक धोकादायक ठरत आहे.

अपघात टाळण्यासाठी काही जागरूक नागरिकांनी या खड्ड्यात झाडाची फांदी लावून इशारा दिला होता. मात्र आता ती देखील हटविण्यात आल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येणे कठीण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा मृत्यूचा सापळा बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक महिन्यांपासून हा खड्डा कायम असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. राज्य महामार्गावरील इतक्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, राजकीय पुढारी आणि स्थानिक जनप्रतिनिधी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. “जनतेच्या प्रश्नांपेक्षा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असलेले लोकप्रतिनिधी आता तरी जागे होतील का?” असा उपरोधिक सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन हा खड्डा बुजवावा, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here