निवडणुक कार्यकर्त्यांची, स्पर्धा मात्र नेत्यांची.

0
657

निवडणुक कार्यकर्त्यांची, स्पर्धा मात्र नेत्यांची.

भाजप, शिंदे गटाचे ठरले तर माहाविकास आघाडीची अजुनही अनिश्चितता.

राजु तुरणकर – संपादक.

दीर्घ प्रतीक्षेनंतर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला
वणी नगरपालिका क्षेत्रातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुती किंवा महाआघाडीचे गणित जुळलेले नाहीत परिणामी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार याची पूर्ण स्पष्टता अद्याप झालेली नाही. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उच्च विद्याविभूषित ठरल्याची बातमी आहे. तथापि प्रत्येक पक्षाने आपापल्या इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडी चे घटकपक्ष एकत्र येऊन लढणार किंवा नाही याची स्पष्टता नसल्याने नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या मैदानात बहुरंगी लढती रंगतील, असे प्राथमिक चित्र आहे. दीर्घ कालावधीनंतर नगरपालिका निवडणुका होत असताना वणी नगरपालिकेतील राजकीय समीकरणे कमालीची बदललेली आहेत शिवाय निवडणूक कार्यकर्त्यांची, स्पर्धा मात्र नेत्यांची रंगली आहे. हे आत्ताच्या राजकीय वातावरणाचे मोठे वैशिष्ट्य सांगता येईल. १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. भाजप उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा आटोपल्या. मात्र आघाडीचे नेते अजुनही कार्यकर्त्यांचा नेम लावणार की गेम करणार हे अजुन निश्चित झाले नाही, फक्त बैठकांचे गुऱ्हाळ चालू आहे.

वणी नगर पालिकेत सत्तापालट घडावा यासाठी आमदार संजय देरकर यांनी शक्ती लावली आहे. विधानसभेतील काँग्रेस नेते व मतदारांनी दिलेली साथ याची जाणीव ठेवून काँग्रेस सोबत युती व्हावी अशी प्रामाणिक भावना ठेवून आघडी घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.या दोन्ही पक्षातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाचा यासाठी आघाडीत ताण निर्माण झाला होता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आमदार संजय देरकर यांनी स्पष्ट भुमिका घेतल्याने याविषयी सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानीक सत्तेतील नेते यांच्या द्वेष पुर्ण राजकीय वर्तणुकीचा आघाडीतील नेत्यांना फार मोठा फटाका बसला आहे, अनेकांना व्यक्तिगत पातळीवर टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) मनसे व वंचीत आघाडीचे सर्व नेते धडा शिकविण्यासाठी एकत्र आल्यास नवल वाटू नये.

निवडणूक कार्यकर्त्यांची स्पर्धा मात्र नेत्यांची अशी अवस्था या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आघाडीतील नेत्यांना कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी स्वतःचे हेवेदावे विसरून कार्यकर्त्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. नगरपालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडी घडून आली तर कार्यकर्ता निवडून येण्याची खात्री आहे. महा विकास आघाडीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे आघाडी करूनच निवडणुक लढावी असे स्पष्ट मत आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आघाडी ओढावून घेणार नाही व निश्चितच आघाडी घडून येईल. असे स्पष्ट संकेत आहेत. मात्र तसे न झाल्यास कार्यकर्तेही नेत्यांना माफ करणार नसल्याचा सूर उमटत असून निवडणुकींच्या तोंडावर कार्यकर्ते नेत्यांची साथ सोडून राजकीय उलथापालथ घडवून आणतील व याचे दूरगामी परिणाम माहविकास आघाडीला भोगावे लागतील. अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सूरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here