वणी शहरात झांडी-मुंडी, मटका व जुगार खुलेआम.

0
447

वणी शहरात झांडी-मुंडी, मटका व जुगार खुलेआम.

पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष – गुन्हेगारीला अभय ?

राजू तुरणकर – लोकवाणी जागर वणी शहरात सध्या झंडी-मुंडी, अवैध  विक्री, मटका व जुगार हे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असून शहराची कायदा-सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. काही ठराविक भागात दिवसाढवळ्या हे धंदे सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. चोरी, भांडणे, महिलांवरील अत्याचार व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना, जबाबदार यंत्रणा केवळ मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रश्न असा आहे की—हे सर्व धंदे प्रशासनाच्या माहितीत असूनही कठोर कारवाई का होत नाही ? करवाई केवळ दिखावा स्वरूपाची असते, मूळ कायद्यातील पळवाटा शोधून काही ठराविक लोकांना पोलीस संरक्षण किंवा अभय दिले जात आहे काय? सर्वसामान्यांवर कडक कारवाई आणि गुन्हेगारांवर सौम्य धोरण हा दुजाभाव का?

अवैध धंद्यांवर कारवाई की केवळ दिखावा? कठोर कायद्याखाली कारवाई करण्याची गरज, शहरात पोलीस प्रशासन …

वणी शहर व परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई होत असल्याचे वारंवार जाहीर केले जाते. मात्र प्रत्यक्षात कारवाई झाल्यानंतर काहीच तासांतच तेच अवैध व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

कारवाईच्या नावाखाली तात्पुरती धडक मोहीम राबवली जाते; पण त्यानंतर पुन्हा तेच प्रकार सुरू राहतात. याचा अर्थ कारवाई फक्त दाखवण्यासाठी केली जाते आणि नंतर वसुलीचा खेळ सुरू राहतो, अशी चर्चा शहरात रंगत आहे. जर प्रशासन खरोखरच गंभीर असेल, तर मूळ आणि कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी आळा घालणे आवश्यक आहे.

अवैध दारू विक्री, जुगार, मटका, सुगंधित तंबाखू विक्री आदी प्रकारांमुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत आहे. सामाजिक वातावरण बिघडत असून कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

म्हणूनच संबंधित यंत्रणांनी केवळ दिखाऊ कारवाई न करता कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधारांवर कारवाई करावी, तसेच नियमित आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे. संबंधित बेकायदेशीर धंदे त्वरित बंद करून दोषी पोलिस अधिकारी व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही जोरदार मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here